Breaking Ticker

रुधाना गावात बुद्धविचारांचा जागर!



‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाच्या प्रवरणा दिनानिमित्त भव्य धम्मप्रबोधन सोहळा उत्साहात संपन्न!

दैनिक समीकरण सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी

संग्रामपूर :- तालुक्यातील रुधाना येथे रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रवरणा दिनानिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित धम्मप्रबोधन कार्यक्रमातून तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार, फुले-शाहू-आंबेडकर यांची परिवर्तनवादी विचारधारा आणि धम्म चळवळीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष भाऊ सपकाळ यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून समाजात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेबाबत चिंता व्यक्त केली. तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमी मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र प्रवक्ते भाई बाबुराव सरदार होते. यावेळी आंबेडकरी चळवळीत कार्यरत असलेले आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव सुजित भाऊ बांगर, ऑल इंडिया पँथर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा नेते पंकज शेगोकार, टीम परिवर्तन ग्रुप संग्रामपूरचे प्रा. ऍड. अमोल खंडेराव सर, राहुल नितोने, राजू पाचपोर, प्रशांत तायडे, नारायण वानखडे, उदेभान दांडगे आणि शेषराव वानखडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्मप्रबोधनातून सामाजिक परिवर्तन, व्यसनमुक्त समाज आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार या विषयांवर विचार मांडण्यात आले.

 उपस्थित मान्यवरांनी धम्म चळवळीला गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन बुद्धरत्न नवयुवक मित्र मंडळ, रमाई महिला मंडळ रुधाना आणि समस्त समाजबांधव यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली. रुधाना परिसरातील तसेच आसपासच्या गावखेड्यांतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या धम्मप्रबोधन कार्यक्रमाला पत्रकार उदेभान भाऊ दांडगे, रतन भाऊ भगत आणि मुकिंदा भाऊ गव्हांदे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे वृत्तांकन केले. अशा प्रकारे रुधाना येथे साजरा झालेला प्रवरणा दिन हा केवळ ग्रंथ समाप्तीचा कार्यक्रम न ठरता बुद्धांच्या विचारांचा प्रसार, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा वारसा आणि समाजात वैचारिक जागृती निर्माण करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.