दैनिक समीकरण उरण : सुनिल ठाकूर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व स्वराज्याच्या इतिहासाची प्रेरणा देणारे शिव किल्ले साकारण्यात ग्रामीण भागातील बाल सवंगडी मग्न आहेत. उरण तालुक्यातील दिघोडे येथील शिवप्रेमी अनिल गजानन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली साईश विश्वनाथ पाटील यांनी त्यांच्या
बाल सवंगड्यांच्या मदतीने कल्पकतेतून एका प्रेरणादायी शिवकालीन प्रताप गड किल्ल्याची उभारणी केली आहे. शिव किल्ल्याच्या निर्मितीसाठी परिसरात उपलब्ध असलेल्या दगड, माती, विटा व रंगांचा तसेच विविध सजावटीच्या साहित्याचा वापर करत, किल्ल्याची तटबंदी, प्रवेशद्वार , बुरुज, पायऱ्या व मावळे या बाल मावळ्यांनी प्रताप गड किल्ला उभारताना साकारले आहेत. त्यामुळे परिसराला शिवकालीन स्वरूप प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम, आदर आणि त्यांचा महापराक्रम या ऐतिहासिक शिव किल्ल्यातून दिसून येत असून, ऐतिहासिक वारसा जपण्याची भावना देखील या मुलांनी बदलत्या जीवनशैलीत जपली आहे.
