दैनिक समीकरण प्रतिनिधी -गंगाखेड तानाजी चंदे
युवा सेना उपजिल्हाप्रमुख शंकर भेंडेकर महाराज यांचा गावकऱ्यांकडून जाहीर सत्कार
गंगाखेड तालुक्यातील झोला फाटा येथील तुटक वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वीजपुरवठा नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना ही गंभीर समस्या लक्षात घेऊन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर भेंडेकर महाराज यांनी महावितरण संबंधित प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून नुकतीच या वस्तीला वीज जोडणी (लाईट) मिळाली आहे.झोला येथील वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण झाल्या बद्दल तुटक वस्तीतील ग्रामस्थांनी शंकर भेंडेकर महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन जाहीर सत्कार केला.
सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजी; गावकऱ्यांमध्ये पश्चातापाची चर्चा
या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने गावातील राजकीय आणि विकासकामांच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी गावाचा विकास निधी हडप केला, मात्र निवडून आलेला लोकप्रतिनिधी कधीही गावातील समस्या सोडवायला फिरकला नाही.अशा तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव होऊनही शंकर भेंडेकर महाराज यांनी खचून न जाता जनतेची कामे सुरूच ठेवली. हे पाहून "आम्ही निवडणुकीत शंकर महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो असतो, तर आज गावाची कामे अजून ताकतीने झाली असती," असा पश्चाताप गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत असून या चर्चेने जोर धरला आहे.
सत्काराला उत्तर देताना केले महत्त्वाचे आवाहन:
ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शंकर भेंडेकर महाराज म्हणाले की, "जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवणे हेच माझे पहिले कर्तव्य आहे. पद असो वा नसो, गावाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. आगामी काळातही गावातील रस्ते, पाणी आणि इतर विकासकामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. बदलत्या काळात विकास हाच सर्वात महत्त्वाचा आहे; त्यामुळे जो प्रत्यक्ष विकास करेल, त्याच्या पाठीमागे गावकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहावे," असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला आणि विकासकामांच्या धडाक्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उपस्थिती:
या सत्कार सोहळ्याप्रसंगी जगन्नाथ गुट्टे, माऊली अण्णा मुंडे, शंकर मुंडे, प्रल्हाद पाळोदे, चैतन्य पाळवदे, महादेव मुरकुटे, ओंकार मुरकुटे, ऋषिकेश मुरकुटे, ओम मुंडे, शहाजी आंधळे, सुधाकर मुंडे यांच्यासह वस्तीतील महिला भगिनी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
