केडगाव -चौफुला नजीक महामार्गावर मादी तरसाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
दैनिक समीकरण वरवंड प्रतिनिधी :
दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी तरसाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित मादी तरसाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
वन्यप्राणी शहरांकडे किंवा मानवी वस्तीकडे येण्यामागे कमी होत चाललेले जंगल आणि वाढते अनैसर्गिकरण ही प्रमुख कारणे असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच परिसरात ऊस पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा वावरही वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.
परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून दैनंदिन जीवन जगावे लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, महामार्गावरील संवेदनशील ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
