Breaking Ticker

करंजाडे पाणी प्रश्न सोडवा : सरपंचांसह ग्रामस्थांचा सिडको अधिकार्‍यांना घेराव.



पनवेल प्रतिनिधी:- धनाजी पुदाले

पनवेल जवळील करंजाडे पाणीप्रश्नावर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व  रहिवाशांसमवेत सिडको अधिकार्‍यांबरोबर झालेल्या  बैठकीत करंजाडे पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. एक आठवड्यात पाणीप्रश्न मार्गी लागेल, अशी हमी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एन. सी. चोथाणी यांनी दिली. या वेळी पाणीप्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा सरपंचांनी प्रशासनाला दिला आहे .

करंजाडेमधील सेक्टर ०३, ०४, ०५ व ०६ मध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. रात्रभर जागूनही पाणी मिळत नाही. सिडको प्रशासन मोठमोठ्या सोसायट्यांना दोन -तीन दिवसांनी एखादा टँकर पाणी पुरवते. तो पुरत नसल्याने टँकर विकत घ्यावा लागत आहे. लग्नसराई असल्याने अनेकांच्या घरात  कार्यासाठी नातेवाईक येत असताना घरात पाणी नसल्याने हवालदिल झालेल्या नागरिकांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना त्याचा जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मंगळवारी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एन. सी. चोथाणी यांचे कार्यालयात सरपंच मंगेश शेलार, भाजप शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, ग्रामपंचायत सदस्य आतिश साबळे, सचिन कदम, प्रमोद जाधव, बाळासाहेब भोसले, नवनाथ चवरे, प्रदीप भडवले, सानिल मोरे व सोसायट्यांचे पदाधिकार्‍यांनी धडक देत त्यांना याबाबत जाब विचारला.

यावेळी नेहमीप्रमाणे एमजेपीकडून पाणीपुरवठा कमी होत असल्याचे कारण सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. नवीन लाईन ‘वाय’  वरून पाणी घेतल्यावर पाणी व्यवस्थित मिळेल, पण जुनी लाईन बंद केल्यास कुंडेवहाळ आणि वरचे ओवळे या गावांचा प्रश्न निर्माण होतो. त्यांची पाईपलाईन बदलेपर्यंत ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले. या वेळी सेक्टर ०६ हे उंचावर असल्याने तेथे  नवीन जलकुंभ बांधावा किवा करंजाडे गावाला दिली तशी जोडणी देण्याची मागणी सरपंचांनी केली. अखेर एमजेपीबरोबर  संयुक्त बैठक  घेऊन नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा कधी सुरू करण्यात येईल याचा निर्णय घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे ठरले.

    करंजाडे गावाला १७ एमएलडी पाणी लागते व पुढील गावांना तीन एमएलडी पाणी लागते, पण सध्या आम्हाला कमी पाणी मिळत आहे. नवीन पाईपलाईन सुरू झाल्यावर आम्हाला एमजेपीकडून २६ एमएलडी पाणी मिळणार असल्याने हा पाण्याचा सुटेल. त्यासाठी कुंडेवहाळ आणि वरचे ओवळे येथील पाईपलाईन बदलणे आवश्यक आहे.-एन. सी. चोथाणी, कार्यकारी अभियंता, सिडको.

    सिडकोचे अधिकारी नवीन पाईपलाईन काम पूर्ण होऊनही पाणी सुरू करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सेक्टर ०६ हा उंचावर असल्याने तेथील सोसायट्यांना पाणी कमी दाबाने मिळते. त्यासाठी नवीन जलकुंभ किंवा त्यांना वेगळी लाईन देणे आवश्यक आहे. याबाबत सिडकोने सर्व्हे करून निर्णय घेण्याची आमची मागणी आहे. -मंगेश शेलार, सरपंच, करंजाडे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.