सुनिल वर्मा
सिंदखेडराजा:- समृद्धी महामार्गावर चालकांच्या आरामासाठी उभ्या असलेल्या ट्रक मधील डिझेल चोरी करणाऱ्या दोघांना पकडण्यात गस्तपथक पोलिसांना यश आले आहे. यापुढे डिझेल चोरीला आळा बसणार असा विश्वास महामार्ग पोलिसांनी व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र दुसरबीड व उपकेंद्र फर्दापूर दरम्यान उभ्या असलेल्या जड वाहनातील डिझेल चोरणारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. महामार्गावर पेट्रोल पंप किंवा टोलनाक्यांचा आसरा घेत अनेक वाहन चालक हे रात्रीला आराम करण्यासाठी, आपले वाहन तेथे सुरक्षित असल्याच्या भावनेने उभे करतात. वाहन चालकांना झोप लागल्यानंतर डिझेल टाकीचे लॉक तोडून गाडीमधील डिझेल स्वयंचलीत मोटारपंपाच्या साह्याने पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्या स्वतःच्या कॅनमध्ये भरून चोरटे मोकळे होतात. ह्या घटनांच्या बऱ्याचशा वाहनचालकांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यासाठी शोध मोहीम राबवूनही डिझेल चोर हाती लागत नव्हते. नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी डिझेलच्या कॅन असलेल्या गाडीचा अपघात झाल्याने, संशयित डिझेल चोरांचा जागेवरच जळून कोळसा झाला होता.
तर एकाचा इस्पितळात मृत्यू झाला होता. त्याघटनेवेळी भरलेल्या डिझेल कॅनसह एक स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कार्पिओ जप्त करीत बीबी, ता. लोणार पोलीस ठाण्यात पुढील तपास करण्यासाठी लावलेली आहे. दरम्यान काल दि. १४ जून, बुधवारी रात्री ११.२५ वा. दरम्यान पोलिस पथकाची रात्रीची गस्त सुरु असतांना समृद्धी महामार्ग चॅनेल क्र. ३१० जवळच्या पेट्रोल पंपानजीक श्री. डिघोळे यांच्या हॉटेलवर दोन जण चहापाणी करण्यासाठी थांबले होते. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार, कर्मचारी दिनकर राठोड, अरुण भुतेकर व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सचिन सनान्से, उमेश नागरे, चालक गणेश चाटे आदिंना एक स्कार्पिओ क्रमांक एम. एच. १५ - ईबी - ०४८७ ही संशयास्पद वाटल्याने गस्त चमूने त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यातील दोघांनी उडवाउडीची उत्तरे दिली. बरोबर त्याचवेळी दुसऱ्या स्विफ्ट डिझायरच्या चालकाने पोलिसांना पाहताच जालना दिशेने भरधाव वेगात धूम ठोकली. त्यामुळे संशय आणखी बळावल्याने पोलीस पथकाने स्कार्पिओची तपासणी केली. तेंव्हा त्यात ३५ लिटर क्षमतेच्या पाच ते सहा रिकाम्या कॅन्स आढळून आल्या. पोलिसी खाक्यानुसार दोघांची यथोचित चौकशी केल्यानंतर दोघांनीही आपण डिझेल चोरण्यासाठी आलो होतो, हे कबूल केले. त्यांची नावे शेख अल्ताफ शेख आयुब वय २४ वर्षे रा.दहेरकर वाडी, जुना जालना व मोहम्मद फैजान मोहम्मद रफीक वय २८ वर्षे राहणार संजयनगर, जुना जालना अशी आहेत. दोघांनाही पुढील तपास व कारवाईसाठी बीबी, ता. लोणार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्या तपासात सर्व निष्पन्न होईल, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले व यापुढे महामार्गावरील डिझेल चोरांना आळा बसेल अशी आशा व्यक्त केली.
महामार्ग पोलीस अधीक्षक, यशवंत सोळंके, नागपूर ह्यांनी गस्त कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फोन करून केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच गस्त पथकाला योग्य ते बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

