शहादा,दि.१६ (प्रतिनिधी):
येथील दीनदयालनगर परिसरातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित दोन दिवसीय उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, महाप्रसाद आणि नूतन लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी, रविवारी मंदिरात लघु रुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेत परिसरातील सहा जोडप्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने सहभाग घेतला. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी होती. सायंकाळी उशिरा मंत्रोच्चारांच्या घोषात महाआरती करण्यात आली ज्यासाठी शहादा शहरातील शेकडो भाविक उपस्थित होते. मंत्रोच्चार पौराहित्य तुळजाभवानी मंदिराचे पुजारी शामकांत महाराज, हरीश महाराज, पुष्कर जोशी, सचिन पत्की महाराज यांनी केले.सोमवारी मंदिर प्रांगणात भव्य महाप्रसाद आणि भंडारा वाटपाचा कार्यक्रम पार पडला. 'हर हर महादेव'च्या जयघोषात सुमारे दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शिस्तबद्ध नियोजनामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेता आला. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा व नगरसेवकांचा करण्यात आलेला सत्कार. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला.या सोहळ्याला उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांच्यासह शहादा नगरपालिकेचे विविध विषयांचे सभापती आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा दोन दिवसीय सोहळा यशस्वी करण्यासाठी महादेव सेवा समितीचे प्रमुख तथा भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, श्री शिवछत्रपती ग्रुपचे अध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह सुनील देवांग, संजय देवांग, डॉ. चंद्रभान कदम,संत सावता भाजी मंडईचे सतीश महाजन, अनिल साळुंखे लक्ष्मिकांत अग्रवाल, दिनेश तांबोळी, संजय क्षीरसागर,पंकज कोळी, नितीन कोळी, संतोष शिंदे (आप्पा), राकेश गुंजाळ, समाधान पाटील, राकेश मराठे, जयेश बडगुजर, भूषण सोनार, गुणवंत खैरनार,भरत कोळी आणि गोपाळ सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले. या दोन दिवशीय उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील शालेय बालक व विद्यार्थिनींनी यात सक्रिय सहभाग नोंदवला तसेच महिलांनी रांगोळी काढून आपला सहभाग नोंदवला.
