सुमेध दामधर प्रतिनिधी
संग्रामपूर (20 मार्च 2026): तालुक्यातील सोनाळा, दुनकी व बावनबीर शिवार परिसरात बिबट्याच्या हालचालींनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांत बिबट्याने हरिण आणि काळविट या वन्यप्राण्यांची शिकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी बावनबीर या शिवारात विजय भगत नामक यांच्या शेतात एका शेतात काळविट मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुनकी येथील राहुल पुंडे यांच्या शेत शिवारात हरीण चा मृतदेह सापडला. दोन्ही प्रकरणांमध्ये बिबट्याने हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनांमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याने शेतकरी शेतीची कामे करताना धास्तावलेले दिसत आहेत. रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळले जात असून, जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करून परिसर सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
