शहादा प्रतिनिधी
शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने येत्या सोमवारी (दि. २३) विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, या पार्श्वभूमीवर शहरात अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकल हिंदू समाज, शहादा यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता शहरातील प्रेस मारुती मैदान येथे या संमेलनाला सुरूवात होणार आहे. त्याआधी सायंकाळी ४.३० वाजता गांधीनगर येथील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येईल. पारंपरिक वेशभुषा, ढोलताशांचा गजर, भगवे ध्वज, विविध सांस्कृतिक आणि धार्मिक देखावे हे या शोभायात्रेचे आकर्षण असेल. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा दोंडाईचा रस्त्यावरील प्रेस मारुती मैदान या संमेलनस्थळी पोहोचेल.
या संमेलनात अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करतील. ह.भ.प. भागवताचार्य खगेंद्र महाराज हे या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक असून, यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. जयंतीभाई भाडेसिया (सुरत) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असतील.
या संमेलनाची आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू असून, यशस्वीपणे संमेलन पार पाडण्यासाठी विविध समित्यांच्या माध्यमातून काम सुरू झाले आहे. संमेलनासाठी जागृती करण्याच्या हेतूने शहरभर कमानी उभारतानाच बॅनर्स लावण्यात आले आहेत. जाहिरातींच्या माध्यमातूनही संमेलनाबाबतची उत्सुकता वाढविण्यात येत आहे. संमेलनासाठी येणार्यांसह स्थानिकांच्या सोयीसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात आहे. शहादा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभायात्रा व संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
