Breaking Ticker

क्षयरोग हा गंभीर परंतु पूर्णपणे बरा होणारा आजार

 


शहादा प्रतिनिधी 

क्षयरोग हा गंभीर परंतु पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार होणे गरजेचे आहे. क्षयरोग रुग्णांसाठी सकस व पौष्टिक  आहार अत्यंत आवश्यक असतो. परंतु शहरातील क्षयरोग बाधित रुग्णांची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना सकस आहारचा मदतीसाठी समाजाने पुढे सरसावले पाहिजे असे प्रतिपादन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले.

    येथील नगर परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी  क्षयरोगा विषयी माहिती देऊन प्रातिनिधिक स्वरूपात पाच क्षयरोग रुग्णांना गहू, तांदूळ, तेल, गुळ, शेंगदाणे आदी पौष्टिक पदार्थ असलेले निक्षय पोषण आहार किटचे वाटप नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले.

दरम्यान,शहादा शहरात क्षयरोगायचे ४० रुग्ण असून या रुग्णांना टीबी च्या उपचारांदरम्यान औषधांचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे रुग्णांसाठी सकस व पौष्टिक आहार अत्यंत आवश्यक असतो. परंतु काही गरीब व गरजू रुग्णांना हे शक्य होत नाही. यासाठी शहरातील  ४० क्षयरोग बाधित रुग्णांना सकस आहार मिळावा यासाठी पालिकेतील सर्व लोकप्रतिनिधी या रुग्णांना सहा महिन्यांसाठी दत्तक घेऊन त्यांना सकस आहार पुरवून त्यांच्या जीवनात आशेच्या किरण आणणार असल्याचे क्षयरोग पथकाच्या लॅब पर्यवेक्षिका मेघा खारकर यांनी सांगितले. याबाबत पालिकेतील सर्व नगरसेवकांना सहा महिन्यांसाठी एका रुग्णाला दत्तक घेण्याचे आवाहन देखील करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दाखविलेले दातृत्व व सहकार्याबद्दल जिल्हाक्षयरोगाधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र वाळवी यांनी आभार मानत. समाजातील इतर दात्यांनीही क्षय रुग्णांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी क्षयरोग पथकाच्या सीनियर टीबी लॅब सुपरवायझर मेघा खारकर यांनी टीबी विषयी मार्गदर्शन करून जनजागृती केली. यावेळी आशा भारती चौधरी, सुभद्रा कोळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेघा खारकर, तुषार गोसावी, उमेश पाटील यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.