Breaking Ticker

वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त व्याखानाचे आयोजन



शहादा- कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलातील वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त व्याखानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड उपस्थित होते. तर प्रमुख व्याख्यते म्हणून एस.टी.को.ए. संस्थेचे विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शहादा, येथील इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. उल्हास सोनवणे उपस्थित होते. मान्यवरांनी विज्ञानाचे आद्य प्रवर्तक सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने सायन्स फोरमचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार पुष्पगुच्छ देवुन करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रथमवर्ष ते एम. एस्सी. विज्ञान वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उदघाटनपर संबोधनात डॉ. उल्हास सोनवणे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन आपण दरवर्षी २८ फेब्रुवारीला साजरा करतो, याच दिवशी सी. व्ही. रमन यांनी १९२८ साली ‘रमन परिणाम’ (Raman Effect) हा महत्त्वपूर्ण शोध लावला. या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये Nobel Prize प्रदान करण्यात आले. त्यांच्या या अद्वितीय कार्याच्या स्मरणार्थ भारतात हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील संशोधन नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण विज्ञानाचा वापर करतो-मोबाईल, संगणक, वाहने, औषधे, इंटरनेट या सर्व गोष्टी विज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य झाल्या आहेत. विज्ञानामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेगवान झाले आहे. आजच्या युगात भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. अंतराळ संशोधन, वैद्यकीय विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारताने जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारणे ही काळाची गरज आहे. अंधश्रद्धा, गैरसमज आणि अपसमज दूर करून तर्कशुद्ध विचार करणे हे विज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विज्ञान दिन हा केवळ एक उत्सव नसून प्रेरणेचा दिवस आहे. जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि नवकल्पनांची तयारी हीच विज्ञानाची खरी सुरुवात आहे. आपल्यापैकी अनेक जण भविष्यात मोठे वैज्ञानिक, संशोधक किंवा अभियंते होतील. देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे, असे सविस्तरपणे स्पष्ट केले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर सत्याचा शोध घेण्याची प्रक्रिया आहे. विज्ञान आपल्याला विचार करण्याची आणि तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची सवय लावते. आजच्या वेगवान युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही असे मत स्पष्ट केले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. आर. डी. पाटील यांनी केले. तर उपस्थितांचा परिचय प्रा. डॉ. के. एल. पाटील यांनी करून दिला. तर आभार प्रकटन पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख व सायन्स फोरमचे समन्वयक डॉ. बी. वाय. बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधूनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत विज्ञान शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. संजयजी जाधव, सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव ताईसाहेब वर्षाताई जाधव, कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा. डॉ. हिमांशु संजयजी जाधव व संस्थेचे समन्वयक श्री. संजय राजपुत यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.