Breaking Ticker

सोनाळा ग्रामपंचायतीतील कर्मचारी भरतीवर प्रश्नचिन्ह; चौकशी करून ठराव रद्द करण्याची मागणी



 गावकऱ्यांना माहिती न देता भरती प्रक्रिया राबवल्याचा आरोप; युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन


 सुमेध दामधर प्रतिनिधी 

       संग्रामपूर (12 मार्च 2026) : संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत सोनाळा येथे करण्यात आलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून भरतीचा ठराव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी युवाशक्ती ग्रामविकास संघटनेचे बुलढाणा जिल्ह्यातील युवा कार्यकर्ते प्रकाश मात्रे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या वतीने पंचायत समिती संग्रामपूर येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामपंचायत सोनाळा येथे कर्मचारी भरती संदर्भात ग्रामपंचायत बैठकीत ठराव घेण्यात आला. मात्र या प्रक्रियेबाबत गावातील नागरिकांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तसेच ग्रामसभेमध्ये या विषयावर कोणतीही चर्चा करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तसेच शासनाच्या नियमांनुसार ग्रामपंचायतीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पारदर्शकता ठेवणे, ग्रामसभा घेणे आणि नागरिकांना माहिती देणे आवश्यक आहे. 

परंतु सदर भरती प्रक्रियेत या नियमांचे पालन झाले नसल्याने ही प्रक्रिया नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याची शंका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून गावातील युवकांनी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी म्हणून काम मिळावे यासाठी अर्ज सादर केले होते. शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीतील भरती प्रक्रियेत महिलांना ५० टक्के आरक्षण देणे तसेच दिव्यांग व्यक्तींनाही प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र या बाबींचा विचार न करता भरती प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण प्रक्रिया गावकऱ्यांना अंधारात ठेवून करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून घाईगडबडीत कर्मचारी भरती करण्याचा प्रयत्न झाल्यास नातेवाईकवाद, पक्षपातीपणा किंवा इतर अनियमितता होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठराव तात्काळ रद्द करावा, अशी मागणी प्रकाश मात्रे यांनी केली आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) तसेच लोकायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.