सौ. सुवर्णा टापरे यांनी मांडली ग्रामविकासाची यशोगाथा
सुमेध दामधर प्रतिनिधी
संग्रामपूर ( 12 मार्च 2026) : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव पिंप्री गट ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णा गणेश टापरे यांनी आपल्या कार्याचा ठसा थेट दिल्लीपर्यंत उमटवला आहे. सशक्त पंचायत नेत्री अभियान राष्ट्रीय सम्मेलन दिल्ली येथे जिल्ह्यातून एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड बुलढाणा जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. ग्रामविकास, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सौ. टापरे यांनी आपल्या नेतृत्वाची वेगळी छाप निर्माण केली आहे. गावात विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबवून सुंदर, स्वच्छ आणि प्रगत गाव घडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. गावातील शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व आकर्षक राहावीत यासाठी त्या सतत कार्यरत राहिल्या. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा निधी उपलब्ध नसतानाही त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्यासाठी धडपड सुरूच ठेवली. गावात गोड्री मुक्ती, व्यसनमुक्ती, दारूबंदी आणि स्वच्छता अभियान यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून ग्रामस्थांमध्ये जनजागृती निर्माण केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत ११ मार्च रोजी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेत आयोजित सशक्त पंचायत नेत्री अभियान राष्ट्रीय सम्मेलनमध्ये त्यांना गौरविण्यात आले. या परिषदेत सौ. टापरे यांना आपल्या कार्याची यशोगाथा मांडण्याची संधी देखील मिळाली. आपल्या यशाचे सर्व श्रेय त्या गावातील ग्रामस्थांना देत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पिंप्री काथरगावच्या सरपंचांनी दिल्लीच्या व्यासपीठावर गावाचा गौरव वाढवल्याने संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात त्यांचे कौतुक होत आहे.
