Breaking Ticker

नगर परिषदेने अखेर मार्च एंडचा मुहुर्त साधत थकबाकीच्‍या वसुलीसाठी कडक पवित्रा



शहादा प्रतिनिधी

 वाढत्‍या थकबाकीमुळे वैतागलेल्‍या शहादा नगर परिषदेने अखेर मार्च एंडचा मुहुर्त साधत थकबाकीच्‍या वसुलीसाठी कडक पवित्रा अंगिकारला आहे. नगर परिषदेने करांच्‍या थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून, या अंतर्गत बुधवारी (दि.११) पहिल्‍याच दिवशी मालमत्ता कर, पाणीपट्टी व गाळे भाडे थकवलेल्या गाळेधारकांवर कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत बुधवारी न.प.च्‍या पथकाने टॅक्सी स्टँड संकुलातील एक गाळा, आरक्षण क्रमांक ४ संकुलातील एक तसेच आरक्षण क्रमांक ५० संकुलातील एक असे एकूण तीन गाळ्‍यांना सील ठोकले. शहादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या नियंत्रणाखाली वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याशिवाय मालमत्ता कर व पाणीपट्टी थकवलेल्या नागरिकांविरुद्धही कारवाई सुरू करण्यात आली असून, थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्‍यात येत आहेत.

दरम्यान, शहरातील सर्व मालमत्ता धारक व गाळेधारकांनी करांच्‍या वसुलीची कारवाई थांबवण्‍यासाठी आपल्या थकीत व चालू वर्षातील मालमत्ता कर, पाणीपट्टी व गाळे भाडे तत्काळ नगरपरिषद कार्यालयात जमा करून सहकार्य करावे. अन्यथा जप्ती व सील करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.