शहादा,दि.२० (प्रतिनिधी)
संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयक मांडण्यात आले असताना, त्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या विरोधात शहादा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कन्साई येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी आदिवासी समाजाच्या महिलांनी एकत्र येत काँग्रेस व इंडी आघाडीचा जोरदार निषेध केला.
कन्साई (ता. शहादा) येथे आयोजित या आंदोलनादरम्यान महिलांनी आरोप केला की, संसदेत व विधानसभेत महिलांना हक्काचे प्रतिनिधित्व मिळवून देणाऱ्या या विधेयकाला विरोध करून काँग्रेसने महिलांच्या प्रगतीला खीळ घातली आहे. यामुळे महिलांना पुन्हा एकदा राजकीय हक्कापासून वंचित राहावे लागणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.यावेळी शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्या कु. प्रियांका ठाकरे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "नारी शक्ती वंदन विधेयकामुळे संसदेत आणि विधानसभेत महिलांची शक्ती वाढणार होती. मात्र, काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या चुकीच्या भूमिकेमुळे आम्हाला या प्रतिनिधित्वापासून वंचित राहावे लागत आहे. गरीब आदिवासी, दलित आणि मागासवर्गीय महिलांना सत्तेच्या सर्वोच्च सभागृहात जाण्यापासून रोखण्याचे काम या आघाडीने केले आहे.
आंदोलनात सहभागी महिलांनी "महिलांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे", "विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा धिक्कार असो", "नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही" अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती.या आंदोलनात कु. प्रियांका ठाकरे, रिनाबाई ठाकरे, सुशीलाबाई पवार, कोमलाबाई पाडवी, रेखाबाई ठाकरे, गणाबाई सोनवणे, हिराबाई ठाकरे, उखडीबाई ठाकरे, आहलीबाई वळवी, तुशाबाई वळवी, सुमन रहासे, नियावंती मोरे, ओबिता ठाकरे, रीता ठाकरे यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पेंढारकर, लक्ष्मण पवार, गिना ठाकरे, गुलाब वळवी, रोहिदास वळवी, आत्माराम बर्डे, धनराज जायसवाल, जगदीश ठाकरे, संतोष पवार, जुमा पटले, सुदाम ठाकरे आदींनी परिश्रम घेतले. या आंदोलनातून शिवसेनेच्या महिलांनी आपल्या हक्कासाठी आम्ही एकजुट असल्याचे ठामपणे दाखवून दिले.
