Breaking Ticker

शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर चौधरी यांची बिनविरोध निवड.



शहादा प्रतिनिधी

     शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर भिका चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

          शहादा तहसील कार्यालयात तहसीलदार संभाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या रेशन दुकानदारांच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीच्या प्रारंभी संघटनेचे माजी अध्यक्ष दिवंगत अरविंद कुवर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने शासनाकडून दुकानावर येणारा धान्याचा पुरवठा योग्य मोजमाप करून मिळावा आणि दुकानदारांचे प्रलंबित कमिशन वेळेवर प्राप्त व्हावे, या मागण्यांवर प्रतिनिधींनी भर दिला.

यावेळी उपस्थित रेशन दुकानदार प्रतिनिधी राजू बच्छाव, जगदीश अग्रवाल, रफिक तेली, यशवंत पाटील, लक्ष्मीकांत भावसार, विजय कदम, गजेंद्र चौधरी आदींनी संघटनेच्या नेतृत्वपदासाठी ज्ञानेश्वर चौधरी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात येऊन त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत सक्रिय आहेत. ते सध्या शहादा तालुका तैलीक (चौधरी) समाजाचे अध्यक्ष, जायण्टस ग्रुपचे पदाधिकारी आणि विविध पतसंस्थांचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व शहादा नगरपालिकेचे विद्यमान प्रतोद म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी नगरपालिकेचे शिक्षण सभापती म्हणून शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कामाची वेगळी छाप पाडली आहे.

*जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू - ज्ञानेश्वर चौधरी*

आपल्या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना श्री. चौधरी म्हणाले की, "तालुक्यातील रेशन दुकानदार बांधवांनी जो विश्वास माझ्यावर टाकला आहे, त्यास मी पूर्णपणे पात्र ठरेल. स्वस्त धान्य वितरण प्रणालीतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करण्याला माझे प्राधान्य असेल. दुकानदार व पात्र लाभार्थी ग्राहकांना वेळेवर धान्य मिळावे, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल."

        ज्ञानेश्वर चौधरी यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि व्यापारी वर्गातून त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.