प्रतिनिधी शहादा
संत संगतीसाठी भाग्य लागते. संतांची संगत, त्यांचे सानिध्य आणि त्यांचे मार्गदर्शन मिळणे हा केवळ योगायोग नसून ती पूर्वजन्मीची पुण्याई किंवा परमेश्वराची कृपा समजली जाते. भाग्य असल्याशिवाय संत भेटत नाहीत असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील यांनी केले. शहादा येथील जानकी मंगल कार्यालयात समस्त सूर्यवंशी तांबोळी बारी समाजाचे वार्षिक अधिवेशन व समाज दैवत संत श्री रूपलाल महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक तांबोळी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण तांबोळी, उपाध्यक्ष अभियंता व जानकी मंगल कार्यालयाचे संचालक विशाल गारोळे, महिला विभागाच्या अध्यक्षा अरुणा तांबोळी, उपाध्यक्षा ज्योती बडोदेकर यावेळी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी संत श्री. रुपलालजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची मांगलिक सुरुवात झाली.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की- तप, व्रत आणि दानधर्म करून कदाचित देव भेटेल परंतु संत-महात्मे- सत्पुरुष भेटण्यासाठी मोठे भाग्य लागते. संतांच्या संगतीत राहूनच मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो. संतांचा सहवास साधकाला निष्पाप करतो आणि वैराग्याची वाट दाखवतो. संतांची संगत हेच जीवनाचे खरे भाग्य मानले जाते. संतांच्या संगतीमुळे आत्मज्ञान प्राप्त होऊन मनाला शांती मिळते. माणसाचे जीवन कृतार्थ होते. ईश्वराजवळ जाण्याचा मार्ग मोकळा होतो. आपल्या आयुष्याचा होम करून दुसऱ्यांच्या भल्यासाठी सहयोगरुपी यज्ञात सहभागी होण्याची संधी मिळते. सत्पुरूषांच्या सानिध्यामुळे व चिंतनातून मनुष्य जीवनाला दिशा मिळते. योग करणे सोपे पण सेवा करणे खूप कठीण आहे. संतांनी समाजसेवेसाठी हेच कठीण कार्य निवडले. असे सांगत त्यांनी देवकथा व समाज जीवनातील अनेकानेक दाखले दिले व सर्व समाजाने शिक्षित होण्याचे आवाहन करून सर्वांना संत श्री. रुपलालजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाप्रसंगी धर्मेंद्र तांबोळी, सौ. राजश्री बडोदेकर, डॉ. दीपेश तांबोळी, सौ. जयश्री बारी, प्रा.अजित तांबोळी यांना आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कार्य गौरव सन्मानाने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव करंजे, सहयोग अजित तांबोळी तर आभार प्रकटन धर्मेंद्र तांबोळी यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम कुमार करंजे, पृथ्वीराज पाटील, कौस्तुभ बडोदेकर, लक्ष्मीकांत तांबोळी, तुषार बारी, भूषण बारी, किशोर मालवीय, कल्पेश तांबोळी, भूपेंद्र तांबोळी , गोरख तांबोळी, जगदीश तांबोळी, दीपक बारी, तुषार बडोदेकर, रोहित करंजे, विलास तांबोळी, सागर सौपुरे, गणेश तांबोळी यांनी परिश्रम घेतले.
