पुणे जिल्हा प्रतिनिधी -अनिल कांबळे
पुणे-बकरी ईद (ईद उल अदा )मुस्लिम बांधवांचा एक पवित्र सण असून हा सण त्याग, समर्पण व दानाचा संदेश देतो इस्लामिक दिनदर्शिकेनुसार जिलहिज्जा महिन्याच्या दहाव्या दिवशी हा सण जगभरात उत्साहात साजरा केला जातो.
इस्लाम धर्मातील प्रमुख सण मानला जाणारा बकरी ईद ( ईद-उल- अदा) चा उत्सव गुरुवारी (28 मे) जिल्हा व परिसरात अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त मुस्लिम बांधवांनी जिल्हा व शहरातील मशिदी व इदगाह मैदानावर सकाळी नमाज पठण करून एकमेकांना बकरी ईद च्या शुभेच्छा देत सलोख्याचे दर्शन घडवले.
नमाजानंतर प्रेषित हजरत इब्राहिम यांच्या त्यागाचे स्मरण करत नियमानुसार कुर्बानी देण्यात आली. या पवित्र सणानिमित्त कुर्बानीच्या मांसाचे गरीब व गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. या दिवशी समाजातील प्रत्येक घटकाला आनंदाचा भाग मिळावा यासाठी दानाचे विशेष महत्त्व असते.
जिल्ह्यातील व शहरी भागातील प्रमुख मशिदी व ईदगाह मैदानावर सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात नमाज पठणासाठी गर्दी केली होती. सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
