मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी
खुलताबाद हे ऐतिहासिक शहर असून, येथे देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या ऐतिहासिक शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी आता नव्याने नियुक्त करण्यात आलेले पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यावर आली आहे.
खुलताबाद पोलिस ठाण्यात नवे पोलिस निरीक्षक म्हणून प्रशांत महाजन यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या समोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत चाललेल्या अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवणे आणि कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करणे हे मोठे आव्हान मानले जात आहे.
खुलताबाद शहर व तालुका परिसरात अनेक दिवसांपासून गुटखा विक्री, मटका, देशी दारू, पत्त्यांचे क्लब, अवैध गौण खनिज उत्खनन, मुरूम, रेती, डबर उत्खनन तसेच अवैध वाहतूक या प्रकारांबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांचे मत आहे की, या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत असून सामाजिक वातावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
नवे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आगमनानंतर आता नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, नियमित गस्त वाढवावी आणि अवैध धंद्यांवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. असे झाल्यास परिसरातील गुन्हेगारीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, असाविश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
गावात पोलिस खुलताबाद ठाण्याच्या हद्दीत अनेक लहान-मोठी गावे येतात. त्यामुळे प्रत्येक सामाजिक सलोखा, शांतता आणि कायद्याचा धाक कायम ठेवणे ही देखील पोलिस प्रशासनासमोरील मोठी जबाबदारी मानली जात आहे.
नागरिकांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे की, पूर्वीप्रमाणे अवैध धंदे सुरूच राहणार की नव्या ठाणेदारांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर प्रभावी कारवाई होणार?
परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ छोट्या-मोठ्या कारवाया करून उपयोग होणार नाही, तर सातत्यपूर्ण आणि निष्पक्ष मोहिम राबवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर लगाम घालणे आवश्यक आहे. तसेच अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या घटकांवरही कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आता येत्या काही दिवसांत पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली खुलताबाद शहर आणि तालुक्यात कितपत बदल दिसून येतो आणि पोलिस प्रशासन नागरिकांच्या अपेक्षांवर कितपत खरे उतरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
