प्रतिनिधी धनंजय माळेकर रिसोड
येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार संजयजी भोकेर यांना तात्काळ झेड प्लस पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन देण्यात आले.
सांगली पोलिसांनी नुकताच संजयजी भोकेर यांच्या हत्येचा कट उधळून लावला असून या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस तपासात हे आरोपी फेब्रुवारी महिन्यापासून रेकी करत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही सिद्धार्थ संजय भोकेर यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची माहिती आहे.
पत्रकार संघटनेने मागणी केली आहे की:
संजयजी भोकेर यांना तात्काळ झेड प्लस दर्जाचे पोलीस संरक्षण देण्यात यावे.
यापूर्वी मिळालेल्या धमक्या आणि सध्याच्या कटाचा परस्पर संबंध तपासून सखोल चौकशी करण्यात यावी.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भोकेर यांना कडक सुरक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन १२ मे २०२६ रोजी देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण आर, रामेश्वर रंजे, सचिन गजरे, अशोक चौधरी, प्रदीप देशमुख, धनंजय माळेकर, सतीश साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
