Breaking Ticker

शेतकऱ्याच्या मुलाची झेप थेट देशातील नामांकित विद्यापीठांत



 तब्बल १५.६५ लाखांची शिष्यवृत्ती मिळवत वैभव ठोंबरेची यशोगाथा

जिंतूर प्रतिनिधी

ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहिली तर ती जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर नक्कीच पूर्ण होऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण निवळी येथील वैभव वैजेनाथ ठोंबरे याने घालून दिले आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या शेतकरी पुत्राने एकाच वेळी देशातील दोन नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवत मोठे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे त्याला तब्बल १५ लाख ६५ हजार रुपयांची शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.

वैभव ठोंबरे याची देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या Indian Institute for Human Settlements येथे “एम.एस्सी. सस्टेनेबिलिटी सायन्स अँड प्रॅक्टिस” या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली असून त्याला १५.६५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यासाठी हे यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे.

याचबरोबर वैभवची Azim Premji University येथे “एम.ए. इन डेव्हलपमेंट” या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देखील निवड झाली आहे. सामाजिक विकास, ग्रामीण परिवर्तन आणि शाश्वत विकास या विषयांमध्ये वैभवला विशेष रुची असून त्याने सातत्यपूर्ण अभ्यास आणि सामाजिक भान जपत हे यश मिळवले आहे.

तसेच Shiv Nadar Institution of Eminence येथे “एम.ए. इन रुरल मॅनेजमेंट” या अभ्यासक्रमाच्या मुलाखतीसाठीही त्याची निवड झाली आहे. त्यामुळे वैभवच्या शैक्षणिक प्रवासाला आणखी नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घरची परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही वैभवने कधीही हार मानली नाही. शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणून अनेक आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जात त्याने शिक्षणाची वाट अखंड सुरू ठेवली. या यशाचे श्रेय त्याने आपल्या आई-वडिलांसह Eklavya India Foundation, Path Education Foundation तसेच कठीण काळात साथ देणाऱ्या मित्रपरिवाराला दिले आहे.

“अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न सुरू ठेवले, त्यामुळेच आज हे यश मिळाले,” अशी भावना वैभवने व्यक्त केली. भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे.

वैभव ठोंबरे याच्या या यशामुळे निवळी गावासह संपूर्ण परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामीण भागातील युवकांसाठी त्याची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.