जत / प्रतिनिधी.
पाचशे एकराहूनही जास्त क्षेत्र सिंचनाखाली येत असलेल्या शेगाव साठवण तलाव क्र. २ या तलावात चाळीस टक्के कचरा व साठ टक्के पाणी अशी परिस्थिती असून पाट बंधारे विभागाने पावसाळ्यापुर्वी या तलावातील संपुर्ण कचरा काढून घ्यावा अशी मागणी शेगाव सर्वसेवा सोसायटी चे माजी चेअरमन व प्रगतशील शेतकरी विजयकुमार बोराडे यांनी माध्यमान्सी बोलताना केली.
शेगाव साठवण तलाव क्र. २ हा तलाव पुर्ण होऊन बरीच वर्षे होऊन गेली आहेत. या तलावाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने तलावाचे काम होत असताना तलावातून काढलेले मोठमोठे दगड व अन्य कचरा तलावाच्या बाहेर न टाकता तो तलावातच टाकल्याने पावसाळ्याच्या दिवसात व म्हैसाळ योजनेचे पाणी या तलावात सोडल्यानंतर हा तलाव पाण्याने पूर्णपणे भरला जात नाही.हा साठवण तलाव पूर्णपणे न भरण्याचे कारण म्हणजे या तलावात पूर्वीपासूनच चाळीस टक्के कचरा पडला आहे.
या पडलेल्या कचऱ्यामध्ये मोठमोठे दगड, व दगडगोटे त्याचप्रमाणे मोठी झाडें व काटेरी झाडें झुडूपे उगवून आल्याने तलावात साठ टक्केच पाणी साठा राहत आहे. तर तलावाच्या चाळीस टक्के भागावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. शेगाव व परिसरातील या सठवण तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या तलावातील राहिलेला चाळीस टक्के कचरा तलावातून बाहेर काढावा अशी मागणी प्रशासन व पाटबंधारे खात्याकडे करीत आहेत.
परंतु प्रशासन व पाटबंधारे खाते यांच्याकडून शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.जर प्रशासनाणे पाटबंधारे खात्यांतर्गत या तलावातील कचरा या पूर्वीच काढला असतातर या तलावात शंभर टक्के पाणी साठून या तलावातील पाणी साठा वाढून हजारो एकर जमिनीचे क्षेत्राला पाणी मिळाले असते.
शेगाव साठवण तलाव क्र. २ वर सध्या शेकडो विधूत मोटरी बसवून शेतीला पाणी पुरवठा सुरू आहे. या तलावातील पाण्याची साठवण क्षमता आणखी वाढविण्यासाठी पाटबंधारे विभाग व प्रशासनाने पावसाळ्यापुर्वी या तलावातील कचरा मोठया मोठया यांत्रिकी मशीनच्या साहाय्याने तलावापासून दूर टाकावा अशी मागणीही विजय बोराडे यांनी माध्यमासी बोलताना केली आहे.
