सम्यक घुले प्रतिनिधी - यवतमाळ
अकोला बाजार येथे शुक्रवारी 5 ते 6 वा.च्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आठवडी बाजारात आलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. बाजार भरत असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी तातडीने ताडपत्रीचा आधार घेत आपला माल सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला.
पावसाचा जोर इतका होता की काही वेळातच बाजार परिसरात पाणी साचले. रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहू लागल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या तंबूंमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचा माल भिजण्याची भीती निर्माण झाली. अनेकांनी माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धावपळ केली.
अचानक झालेल्या पावसामुळे ग्राहकांनीही आसरा घेतल्याने बाजारातील खरेदी-विक्री काही काळ ठप्प झाली. विशेषतः भाजीपाला, फळे व इतर खुल्या जागेत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, पावसामुळे बाजार परिसरातील पाणी निचऱ्याची अपुरी व्यवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने बाजार परिसरात प्रभावी पाणी निचरा व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे..
