सुमेध दामधरसंग्रामपूर तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर शिवारात एका महिलेस शेताच्या धुऱ्याच्या वादातून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक 13 जून रोजी सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
टुनकी येथील सौ. वनिता शिवाजी भिसे (वय 40, रा. टुनकी, ता. संग्रामपूर) या 13 जून 2026 रोजी सकाळी शेतात निंदण करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी लाडणापूर शिवारातील शेतात आरोपी पुरुषोत्तम भगवान भिसे व भगवान कचरू भिसे हे संगनमताने तेथे आले. शेताच्या धुऱ्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी पुरुषोत्तम भिसे याने हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ मारहाण केली. तसेच दुसरा आरोपी भगवान भिसे याने चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात कायमी अप क्रमांक 169/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे करीत आहेत.
