Breaking Ticker

दौंड तालुक्यात आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह



 बोगस डॉक्टर, अवैध गर्भपात आणि नियमबाह्य उपचारांच्या संशयाने नागरिकांमध्ये चिंता.                                        

 दैनिक समीकरण   दौंड प्रतिनिधी : गणेश दिवेकर 

दौंड तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एका बाजूला खामगाव येथे स्वतःच्या बीएचएमएस (BHMS) पदवीचा पूर्ण अर्थही सांगता न आल्याने एका कथित बोगस डॉक्टरचा ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे भांडाफोड झाला, तर दुसऱ्या बाजूला केडगाव येथील एका खासगी रुग्णालयावर अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

खामगाव येथील प्रकरणात स्थानिक ग्रामस्थांनी संशय आल्याने संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याकडे आवश्यक वैद्यकीय पात्रतेबाबत समाधानकारक माहिती नसल्याचे समोर आल्याची चर्चा आहे. त्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, केडगाव येथील एका खासगी रुग्णालयावर अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या तपासणी आणि देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित प्रकरण समोर येईपर्यंत प्रशासनाला याची माहिती नव्हती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

याशिवाय, केडगाव मधीलच काही खासगी रुग्णालयांमध्ये MBBS डॉक्टर प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांच्या नावावर रुग्णांवर उपचार दाखवले जात असल्याचे परिसरातील नागरिक व रुग्ण बोलून दाखवत आहेत. आयसीयू विभागात प्रत्यक्ष उपचार कोण करत आहे, उपचार नोंदींवरील स्वाक्षऱ्या आणि प्रत्यक्ष उपस्थिती यामध्ये तफावत असल्याचे आढळून येत आहे त्याची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

काही ठिकाणी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतानाही त्यांच्या नावांचे फलक लावले जात असल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत. तसेच कुठलेही स्त्री रोग तज्ञ नसताना स्वतःला श्री रोग तज्ञ म्हणून घेऊन प्रसूती, शस्त्रक्रिया केल्या जात आहेत अतिदक्षता विभागासाठी आवश्यक डॉक्टर्स आणि मनुष्यबळ उपलब्ध नसताना अशा सेवा पुरवल्या जात असल्यास त्याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.

यासोबतच काही खासगी रुग्णालयांच्या नोंदणी नूतनीकरण प्रक्रियेत प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा अधिक खाटांची संख्या दाखवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित रुग्णालयांकडे आवश्यक डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी उपलब्ध आहेत का, याची स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत काही रुग्णालयांनी चुकीची अथवा अपूर्ण कागदपत्रे सादर करून मान्यता मिळवल्याच्या  चर्चे ही परिसरामध्ये होत आहेत. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी आणि संस्थांची जबाबदारी निश्चित करून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांच्या मते, बोगस डॉक्टर, संशयास्पद वैद्यकीय व्यवहार, नियमबाह्य उपचार आणि विविध तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणणे आवश्यक आहे. "दौंड तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य नेमके कोणाच्या भरोशावर आहे?" असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

खामगाव आणि केडगाव येथील घटना या स्वतंत्र घटना आहेत की तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेतील व्यापक समस्यांचे संकेत आहेत, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

"दौंड तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; बोगस डॉक्टर, संशयित वैद्यकीय व्यवहार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल."


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.