दोघे जखमी पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर
खुलताबाद तालुक्यातील येसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पावर मासेमारीच्या हक्कावरून दोन गट आमनेसामने आल्याने बुधवारी (दि.१७) तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन नागरिक किरकोळ जखमी झाले. मात्र खुलताबाद पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. गिरजा धरणावर प्रत्यक्ष मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हक्कांसाठी एकलव्य वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव भिकाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली 'मासेमारी हक्क हमारा मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात परिसरातील आदिवासी व मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच काही कारणांवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला.
हा वाद वाढत जाऊन दगडफेकीपर्यंत पोहोचला. अचानक उद्भवलेल्या या प्रकारामुळे धरण परिसरात एकच खळबळ उडाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलिस निरीक्षक प्रकाश महाजन, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील, बाजार सावंगी पोलिस चौकीचे बीट जमादार नवनाथ कोल्हे तसेच कर्मचारी दिलीप बनसोड आणि संतोष भालेराव यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी संयम व कौशल्य दाखवत दोन्ही गटांतील प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या उपाययोजनांवर भर न देता सामोपचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका स्वीकारत वाद मिटविण्यास सहमती दर्शविली.
