अंबाजोगाई प्रतिनिधी(विशाल जोगदंड)
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई, येथे दीर्घकाळापासून रिक्त असलेले उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद अखेर नियमितपणे भरण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने दि.१९ जून २०२६ रोजी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावरून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नतीचा शासन निर्णय निर्गमित केला असून, त्यानुसार श्री. विनोद साळवी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण (ठाणे) यांची उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई या पदावर नियमित पदस्थापना करण्यात आली आहे.
श्री. साळवी हे मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई येथे नियमित अधिकारी उपलब्ध होणार असून, कार्यालयाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती व स्थिरता मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यापूर्वी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार वारंवार इतर जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येत होता. सध्या श्री. हर्षल डाके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव यांच्याकडे अंबाजोगाई कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यामुळे अनेक प्रशासकीय कामांवर काही प्रमाणात मर्यादा येत होत्या.
मात्र, आता नियमित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून श्री. विनोद साळवी यांची नियुक्ती झाल्याने वाहन नोंदणी, वाहनचालक परवाने, कर वसुली, अंमलबजावणी तसेच नागरिकांच्या विविध सेवा अधिक सुरळीत, नियमित आणि गतिमान पद्धतीने पार पडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहनधारक, वाहनचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री. विनोद साळवी यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
