Breaking Ticker

नवीन फवारणी पंप मिळवून देण्याचे आमिष....



चाळीस शेतकऱ्यांना घातला गंडा ५५ हजारांची फसवणूक

मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीनीधा.                                      

खुलताबाद  तालुक्यातील देवळाणा बु. येथे शेतकऱ्यांना नवीन फवारणी पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिसगाव येथील रहिवासी असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीने शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत नवीन फवारणी पंप देण्याचे आश्वासन देत गावातील ४० शेतकऱ्यांकडून जुने फवारणी पंप आणि प्रत्येकी १,३७५ रुपये जमा करून घेतले. मात्र चार महिने उलटूनही ना नवीन पंप मिळाले, ना पैसे परत मिळाले. या प्रकरणी संकेत विठ्ठल कोरडे व सय्यद युसूफ यांनी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसह खुलताबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. शेतकऱ्यांनी वारंवार संपर्क साधला असता संबंधित व्यक्ती "आज येतो, उद्या येतो" अशी उडवाउडवीची उत्तरे देत राहिला. पैसे परत मागितल्यानंतर त्याने फोनवरून शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना जुने फवारणी पंप गमावल्याने आणि पैसे बुडाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेली साधने पुन्हा खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तक्रारदारांनी सर्व ४० शेतकऱ्यांची यादी पोलिसांकडे सुपूर्द केली असून, संबंधितावर फसवणूक, विश्वासघात व धमकीचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत देवळाणा बु. बिट जमादार यू. के. खटके यांनी सांगितले की, प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.