उरण : सुनिल ठाकूर
बी. एस. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी विद्यार्थ्यांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. रंगीबेरंगी पोशाखातील विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर सुंदर दांडिया नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली.या कार्यक्रमात शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत नृत्यात सहभागी होऊन आनंद द्विगुणित केला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र नृत्याचा आनंद घेतला. संपूर्ण शाळेचे वातावरण उत्साह, आनंद आणि चैतन्याने भरून गेले होते.
या आनंदाच्या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले. आईस्क्रीमचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांनी या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख करून देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. आनंद, उत्साह आणि एकतेच्या वातावरणात दांडिया उत्सवाची सांगता झाली.
