महामानवांना अभिवादन व पुष्पार्पण; मंगल मैत्री रॅली, बालिकांची मनोगते, मान्यवरांचे धम्ममार्गदर्शन आणि दिवसभर भोजनदान.
सुमेध दामधर, तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर, सोनाळा येथील सोनाजी नगरमधील उरुवेला बुद्ध विहारात बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाचा प्रवरणा दिन उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंगल मैत्री रॅली, महामानवांना अभिवादन व पुष्पार्पण, बालिकांची मनोगते, मान्यवरांचे धम्ममार्गदर्शन आणि दिवसभर भोजनदान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उरुवेला बुद्ध विहार, सोनाजी नगर येथून संविधान चौक, सोनाळा येथे मंगल मैत्री रॅली काढण्यात आली. या रॅलीत धम्म उपासक-उपासिका, महिला मंडळाचे सदस्य, युवक आणि आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. बुद्धांच्या विचारांचा प्रसार, मैत्रीभावाची जोपासना आणि सामाजिक एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. यानंतर महामानवांना अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. उपस्थित बालिकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर मान्यवरांनी धम्म उपासक-उपासिकांना मार्गदर्शन करताना भगवान गौतम बुद्धांचे प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचे विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष किशोर भाऊ भिडे, भारतीय बौद्ध महासभेचे बुलढाणा जिल्हा संस्कार सचिव बौद्धाचार्य मिलिंद दादा वानखडे, संग्रामपूर तालुका प्रभारी भाऊराव भाऊ गव्हांदे, बौद्धाचार्य निलेश लहासे, तथागत अंभोरे, आकाश इंगोले, आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर, सामाजिक कार्यकर्ते पंकज शेगोकार, संविधान चौक येथील ग्रंथवाचक भाऊराव वानखडे, राजेश भाऊ उमाडे आणि उरुवेला बुद्ध विहाराचे ग्रंथवाचक सुमेध दामधर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विहार समितीच्या अध्यक्षा मायाताई तायडे, उपाध्यक्ष, सचिव, महिला मंडळ, समता नवयुवक मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने धम्म उपासक-उपासिका उपस्थित होते. यावेळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ केवळ वाचनापुरता मर्यादित नसून तो विवेक, नैतिकता, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारा आहे, असा संदेश देण्यात आला. बुद्धांच्या विचारांचा अंगीकार करून समाजातील विषमता, भेदभाव आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवसभर भोजनदानाचा उपक्रम सुरू ठेवण्यात आला. मंगल मैत्री, धम्मविचार आणि सामाजिक बांधिलकीचा संगम साधणारा हा प्रवरणा दिन सोहळा उत्साहात पार पडला.
