Breaking Ticker

वरवंडमध्ये बैलपोळ्याला डीजेचा धुमाकूळ; पोलिस प्रशासन कारवाई करणार का? नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया



छत्रपती शिवाजी महाराज चौक ‘सायलन्स झोन’ घोषित करण्याची मागणी; डीजे बंदीची चर्चा

वरवंड | प्रतिनिधी

वरवंड (ता. दौंड) दि.१० ऑक्टो .येथे बैलपोळा सणानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात डीजेच्या मोठ्या आवाजात जल्लोष करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीची चर्चा सुरू आहे. सणाच्या उत्साहात डीजेच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित होत असून,चौकात अक्षरशः या DJ चालकांनी स्पर्धाच चालू केली होती यावर पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

बैलपोळा हा शेतकरी बांधवांचा पारंपारिक आणि महत्त्वाचा सण आहे. मात्र, सण साजरा करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन होणेही तितकेच आवश्यक आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत योग्य नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ‘सायलन्स झोन’ घोषित करण्याची चर्चा!

यापुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोणताही कार्यक्रम आयोजित करताना डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी या चौकाला ‘सायलन्स झोन’ घोषित करण्यात यावे , चौकच्या लगतच शाळा ,कॉलेज ,महाविद्यालये, तसेच हॉस्पिटल असल्याने चौकात डीजेच्या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरू असल्याचे बोलले जात आहे.

पोलिस प्रशासन कारवाई करणार का?

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होत असल्यास पोलिस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कायदेशीर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरवंडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमांबाबत प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सण-उत्सवांचा आनंद कायम राखतानाच नागरिकांची शांतता, उपस्थित व्यक्तिंचे आरोग्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांनाही प्राधान्य मिळणार का, याकडे आता वरवंड ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.