Breaking Ticker

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. जितेश अंतापूरकरांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत



*संकटग्रस्त बळीराजाला आधार देण्याचा सामाजिक बांधिलकीतून पुढाकार * 

*देगलूर ता. प्रतिनिधी      मारोती पाटील वडजे* ,   

देगलूर : जिल्ह्यात कोरड्या कुकाळाच्या संकटामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणींच्या गर्तेत सापडला आहे. निसर्गाच्या प्रतिकूलतेमुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजासमोर उदरनिर्वाहासह आगामी हंगामाच्या तयारीचेही आव्हान उभे राहिले आहे. या संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याच्या सामाजिक बांधिलकीतून देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापूरकर यांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार आ. जितेश अंतापूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन आपल्या एका महिन्याच्या मानधनाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. अंतापूरकर यांचे याबद्दल कौतूक केले.

दुष्काळामुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे करणे ही काळाची गरज आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असते. मात्र, पावसाच्या अभावामुळे पिकांचे नुकसान झाल्यास

शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद होते. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून मदतीसाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे ठरते. याच भावनेतून आ. अंतापूरकर यांनी आपल्या एका महिन्याच्या मानधनाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा पुढाकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारा असून, संकटाच्या काळात शेतकरी बांधवांना आधार देण्याच्या भूमिकेचे प्रतीक आहे.शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट हे केवळ एका घटकापुरते मर्यादित नसून, त्याचे परिणाम संपूर्ण समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर होत असतात. त्यामुळे दुष्काळग्रस्तशेतकऱ्यांना दिलासा देणे, त्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी बळ देणे ही समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे.

आपल्या मानधनाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द करून आ. जितेश अंतापूरकर यांनी या सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून योगदान दिले आहे. संकटग्रस्त बळीराजाला मदतीचा आधार मिळावा आणि त्याच्या अडचणींची जाणीव व्यापक स्तरावर पोहोचावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असून आ. जितेश अंतापूरकर यांनी बळीराजाला आधार देण्यासाठी घेतलेल्या या भुमिकेचे सर्वस्तरांतून अभिनंदन व कौतूक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.