अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम मोडला
नाशिक प्रतिनिधी- कुणाल दाणेच.
नाशिक। “अभिनंदन! तुम्ही एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे!” गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी ही घोषणा करताच गोदावरीचा पवित्र तीर ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. अमेरिकेचा एकाचवेळी ३०३ शंखनाद करण्याचा पूर्वीचा विक्रम मागे टाकत ५१७ व्यक्तींनी सामूहिक शंखनाद केल्याने नाशिकच्या नावे एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली. भक्ती, श्रद्धा, सामूहिक शक्ती आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणाऱ्या या सोहळ्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी ठरली.
