सुमेध दामधर तालुका प्रतिनिधी
संग्रामपूर (शुक्रवार दि.१६ ऑक्टोबर २०२६) : स्थानिक जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा उकळी बु. येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' अत्यंत उत्साहात व विविध भरगच्च उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिवसभर आयोजित या विविध स्पर्धा व उपक्रमांमुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी ११ वाजता इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी सद्गुरू अण्णा महाराज सार्वजनिक वाचनालय येथे जाऊन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी वाचनालय व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर शाळेत भव्य रांगोळी स्पर्धा व आगळीवेगळी वक्तृत्व स्पर्धा पार पडली. वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शाळेतील बालवाचनालयातील पुस्तके वाचायला देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करून त्यावर आधारित सारांश लेखन केले आणि तोच सारांश वक्तृत्व रूपात सादर केला. तीन तज्ज्ञ परीक्षकांनी स्पर्धक विद्यार्थ्यांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई-वडिलांसह आगामी २६ जानेवारी २०२७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक के. एम. डाबेराव, उपाध्यक्ष वर्षाताई वानखडे, सदस्या सोनालीताई तायडे, शिक्षकवृंद शंकर बगाडे, कोकीळा बोपटे, भीमराव परघरमोल, गजेंद्र सुलतान, प्रवीण लिंगोट तसेच ग्रंथपाल पंकज गोमासे, योगिता बोरसे, राधा वेरूळकर, आशिष तायडे, सम्यक तायडे, विनोद गव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन स्वयंसेवा शिक्षिका कु. दिव्यानी तायडे हिने केले. कार्यक्रमासाठी ध्वनिक्षेपक (साऊंड सिस्टिम) व्यवस्था 'सधम्म सहाय्यता संघा'कडून विनामूल्य पुरवण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
