Breaking Ticker

पंचाळा येथे भगवान बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ प्रवरणा दिन सोहळा उत्साहात संपन्न!



 धम्मक्रांतीच्या विचारांचा जागर; समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा मंगलमय सोहळा!

    दैनिक समीकरण प्रतिनिधी   सुमेध दामधर

संग्रामपूर  तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या क्रांतिकारी विचारांचा जागर करीत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेचा संदेश जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने पंचाळा येथे भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. याच मंगलमय प्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महान धम्मग्रंथाचा प्रवरणा दिन सोहळा मोठ्या उत्साहात, धम्ममय वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन व पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा अध्यक्ष आद. एस. एस. वले सर व वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष देवा भाऊ हिवराडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा चे संग्रामपूर तालुका प्रभारी भाऊराव गव्हांदे होते

 तर भव्य कार्यक्रमाचे सूत्र संचालन भारतीय बौद्ध महासभा बुलाढाना (उत्तर)जिल्हा संस्कार सचिव आद. मिलिंद दादा वानखडे यांनी केले. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्कार उपाध्यक्ष के. के. शेगोकार गुरुजी, वंचित बहुजन आघाडीचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष किशोर भाऊ भिडे, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष देवा भाऊ दामोदर साहेब, साहेबराव भगत, शेगाव तालुकाध्यक्ष प्रवीण भाऊ विरघट, समाज भुषण तथागत अंभोरे, विक्रांत सपकाळ, हुसेन भाऊ सुरत्ने, रणजित सपकाळ, पांडुरंग भारसाकडे, शंकर ससाणे, सचिन शेगोकार, अशोक भाऊ वानखडे, विकास सावंग, श्रीकृष्ण हातेकर (माजी तालुका अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा संग्रामपूर), धम्मपाल गायगोड, सिद्धार्थ बोदडे, दयाराम तायडे, संदीप घाटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील धम्म उपासक व उपाशीका, शान बालक, बालिका व गावकरी तसेच ग्रंथवाचक तथा बौद्धाचार्य निलेश लहासे यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या माध्यमातून तथागत भगवान बुद्धांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री आणि समतेचा मानवतावादी विचार उपस्थित धम्म उपासक-उपासिकांसमोर प्रभावीपणे मांडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मक्रांतीचा विचार केवळ विचारांपुरता मर्यादित न ठेवता तो आचरणात आणावा. शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या बळावर समाजाने प्रगतीची नवी दिशा निर्माण करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि धम्मग्रंथ प्रवरणा दिनाच्या निमित्ताने पंचाळा गावासह परिसरात उत्साहाचे आणि बौद्धमय वातावरण निर्माण झाले होते. विविध गावांतून मोठ्या संख्येने धम्म उपासक-उपासिका या ऐतिहासिक व मंगलमय सोहळ्यात सहभागी झाले. भगवान बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापित होणे ही केवळ धार्मिक घटना नसून विवेक, प्रज्ञा, करुणा, समता आणि मानवतेच्या विचारांना समाजजीवनात स्थान देणारी प्रेरणादायी घटना आहे. तथागतांचा शांतीचा संदेश आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा परिवर्तनवादी विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या सोहळ्यातून अधोरेखित झाला. या भव्य सोहळ्याच्या यशस्वितेसाठी पंचाळा गावातील महिला मंडळ व क्रीडा मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सामूहिक भोजनाचा आनंद घेतला. वंचित बहुजन आघाडीचे संग्रामपूर तालुका महासचिव दीपक पहूरकर यांनी उपस्थित मान्यवर, धम्म उपासक-उपासिका व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.