परभणी, दि. ७ (प्रतिनिधी):
पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरातील सर्व तालुक्यांतून पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाला सुमारे २०० हून अधिक पत्रकारांची उपस्थिती लाभली असून, पत्रकारांच्या एकजुटीचे प्रभावी दर्शन घडले.
या आंदोलनात पत्रकारांच्या सुरक्षिततेपासून ते आर्थिक व सामाजिक हक्कांपर्यंत अनेक महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे मांडण्यात आले. पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ ची कडक अंमलबजावणी करावी, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. सध्या पत्रकारांवर वाढत असलेले हल्ले, धमक्या व दबावाचे प्रकार लक्षात घेता पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस व प्रभावी यंत्रणा उभी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
तसेच पत्रकारांवरील हल्ले व धमक्या थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली. शासनाच्या जाहिरात दरात १५० टक्के वाढ करावी, जेणेकरून ग्रामीण व लहान वृत्तपत्रांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असा मुद्दा पत्रकारांनी मांडला. सध्याच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर जाहिरात दरवाढ अत्यंत आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकारांसाठी लागू असलेल्या पेन्शन योजनेतील कठोर अटी शिथिल करून अधिकाधिक पात्र पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पत्रकारांनी आयुष्यभर केलेल्या सेवेची दखल घेत त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याशिवाय, शासकीय कार्यालयांकडून पत्रकारांना अधिकृत माहिती वेळेत, पारदर्शक पद्धतीने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध करून द्यावी, ही देखील महत्त्वाची मागणी यावेळी करण्यात आली. माहितीच्या अभावामुळे पत्रकारितेवर परिणाम होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
या आंदोलनाचे नेतृत्व ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया, राज्य सहचिटणीस सुरज कदम, राज्य संघटक विजय पाटील, मराठवाडा कार्यकारिणी सदस्य सुरेश जपणगिरे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने, प्रवीण चौधरी, विशाल माने, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण आदींनी केले.
तसेच अनिल आहिरे, गुणवंत सराफ, मारुती जुंठे, बाळासाहेब काळे, श्रीकांत देशमुख, राजन मंगळेकर, विजय कुलकर्णी, विष्णू सायगुंडे, नरहरी चौधरी, नेमिनाथ जैन, मंकर देशमुख, दिलीप बोचळ, भागवत चव्हाण, शेख अनवर लिंबकर, सुभाष सुरसळे, भास्कर लांड, नारायण सोनटक्के, कचरुलाल बारहाते, गजानन धुबे, सय्यद युसुफ, शिवाजी वाघमारे, विवेक मुंडे, दत्तात्रय कराळे, मंदार कुलकर्णी, दिवाकर माने, लक्ष्मीकांत रासवे, लक्ष्मण कचवे, सोमनाथ स्वामी, आनंद मुर्गया, भास्करराव चौधरी, रामा डांगे, तुकाराम जरे, रंगनाथ गडदे, प्रभाकर कुरे, सचिन रायगव्हार, संग्राम खेडकर, रियाज कुरेशी, शिवाजी बोबडे, रामप्रसाद ओढा, गजानन सावळे, शिवाजी शिंदे, बाळासाहेब शिंदे, शंकरराव इटे, धनंजय धबाले, शैलेश काटकर, रमेश बिडवे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना सर्व मागण्यांचे सविस्तर निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनातून पत्रकारांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येत शासनाला ठोस व स्पष्ट संदेश दिला असून, येत्या काळात मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
