दौंड प्रतिनिधी : गणेश दिवेकर
दौंड तालुक्यातील केडगाव येथे जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर गहू व तांदूळ साठवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 320/2026 नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.45 ते सायंकाळी 7.45 वाजण्याच्या दरम्यान केडगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात ही कारवाई करण्यात आली. आरोपी सुनिल विश्वनाथ निंबाळकर (रा. केडगाव, ता. दौंड) याने संबंधित गाळा भाड्याने घेतला होता. मात्र, घाऊक व्यापार व साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या परवान्याची मुदत 2017-18 मध्येच संपलेली असतानाही तो बेकायदेशीर साठा करत असल्याचे आढळून आले.
छाप्यामध्ये सुमारे 492 कट्टे गहू (प्रत्येकी 45 ते 50 किलो) किंमत सुमारे 8,85,600 रुपये आणि 144 कट्टे तांदूळ किंमत 2,84,256 रुपये असा एकूण 10,69,856 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा माल सरकारमान्य रास्त भाव दुकानातील असून, तो काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पुरवठा निरीक्षक पंकज गोपाळ गोरे (रा. म्हसोबाची वाडी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली असून, जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस हवालदार भोर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वागज करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
